गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री'

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री'

नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणांतर्गत देवी
महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना
त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे
स्थान पुन्हा मिळवून देण्यासाटी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते.
दुष्टांच्या निर्दालनासाठी देवीने अनेक अवतार घेतले.

सामान्यजनांना, विद्वानांना तिने पुन्हा सुख प्राप्त करून दिले. तिच्या या
कर्तृत्वाबद्दल तिचे स्तवन व स्मरण करण्यासाठी नवरात्र साजरे केले जाते.
एका प्रसंगात देवीनेच सांगून ठेवले आहे, *''मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर
राहीन. संकटकाळी अनन्यभावाने मला शरण येताच मी प्रकट होऊन तुम्हास दुःखमुक्त
करीन मी तुमच्यावर सदा प्रसन्न असावे म्हणून प्रत्येक अश्विन शुक्ल
प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होमहवन वगैरे प्रकारांनी माझे पूजन करावे.
माझ्यावर अचल निष्ठा ठेवून संकटसमयी जे माझी करूणा भाकतील त्यांच्या सुखासाठी
मी सदैव जपत राहीन'' *यावरून नवरात्र पाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी, असे
म्हणण्यास वाव आहे.

*नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.*

पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

या आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख आपण रोज मन माझे ग्रुप मध्ये करून घेणार आहोत

दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली
दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला
'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि
आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला
'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात
होते.

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या
पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी
तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना
निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील
मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली.
तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की
प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना
यज्ञासाठी बोलावले आहे.

परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे
मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही.
वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ
झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची
वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण
तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत
राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले.
दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दह‍ी वापरले होते. हे सर्व पाहून ती
रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले.

आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न
झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर
त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने
पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती
'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते.
'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या
जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री
दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

तुळजापूरची तुळजाभवानी

तुळजापूरची तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, नवरात्रात नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येते. नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा 21 दिवसांचा असतो.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होत असली तरीही तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. वरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते.
तुळजाभवानी मातेचे स्थान बालाघाट म्हणजेच यमुनाचलावर वसलेले आहे. संरक्षणासाठी दोन्हीकडे पारंपरिक वसाहत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर तसेच पूर्णतः खोलगट भागात असून, सुरक्षेच्या भौगोलिकदृष्ट्या तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी उताराच्या दृष्टीने जावे लागते.
मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ, तसेच अमृतकुंड म्हणजेच पूर्वीचे अंधारकुंड असे नाव प्रचलित होते. उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तुळजाभवानी मातेस पार्वतीचा अवतार समजण्यात येते. त्यामुळे गोमुख तीर्थकुंडातही महादेवाची मूर्ती आहे. त्यापाठीमागे दत्तपादुका आहेत. त्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही कार्यास सुरवात करताना गणेशदर्शन करणे हे पुराणातून सांगितले आहे.
त्यामुळे गणेशदर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य रावरंभा निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या पूर्वीच्या पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी रक्तभैरवाची मूर्ती आहे.
तुळजाभवानीचे होमकुंड सुमारे दहा फूट लांब - रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवाय देवीचा सीमोल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णतः दगडी बांधकाम केलेले आहे.
साधारण बारा फूट लांबी-रुंदीचा सीमोल्लंघन पार आहे. पारावर खोलगट सुपारीच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे आहेत. देवीच्या सीमोल्लंघन पारावर जाण्यासाठी केवळ पश्‍चिम बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. सीमोल्लंघन पाराच्या मध्यभागी पिंपळाचे प्राचीन झाड आहे. सीमोल्लंघन पारावर सूर्योदयाचा प्रकाश येतो. त्यामुळे देवीच्या मुखावर सूर्यप्रकाश येतो.
तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून, नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता, असा इतिहास सांगण्यात येतो. त्यामुळे तुळजाभवानीचे स्थान केवळ राज्य आणि दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या मर्यादित नव्हते, हे आजही स्पष्ट होते. पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यासमोरील परिसर दिसतो. त्यानंतर देवीचे मुख्य सिंहासन आहे. देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणीगृह आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपाच्या बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघराच्या स्थानात देवीचा पाळणा आणि चांदीचा पलंग आहे.
पलंगाची जागा तशी मर्यादित आहे. मात्र पलंगावर असणारी गादी भव्यदिव्य आहे. देवीसमोर भवानी शंकराची मूर्ती आहे. भवानी ही पार्वतीचे रूप आहे. भवानी शंकराच्या समोरील सभामंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केली आहे.
तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानास महत्त्व आहे. देवीच्या मंदिराकडे जाताना पुरातन ओवरीचे स्थान आहे. मंदिराप्रमाणेच खोल परिसर असून, तेथेही तीर्थकुंड आहे. या ठिकाणी आजही रहिवासी आहेत. पूर्वी तुळजाभवानीचे स्थान अनेक कडव्या धर्मविरोधकांचे लक्ष असणारे स्थान असल्याने, या ठिकाणी मंदिराप्रमाणे व तत्सम स्थान राहावे यासाठी हे स्थान निर्माण केले असून, अनेक आक्रमणांच्या वेळी देवी त्या ठिकाणी वास्तव्यास होती, असे सांगण्यात येते.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटाचा मान घटे कुटुंबीयांचा आहे. घटे कुटुंबीय मूलतः मुरूम ता. उमरगा येथील आहे. त्यांचे वास्तव्य सोलापूर - पुणे भागात आहे. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घराची पूजा होते. देवीस दररोज दोन वेळा अभिषेक पूजा कायमस्वरूपी असतात.
नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. त्यानंतर प्रशाळपूजा होते. त्यानंतर देवीस विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन आणि अजावळी आजही होमकुंडावर देण्यात येतो. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
नगरचे भगत (तेली) कुटुंबीय पालखी घेऊन येतात. सुमारे 45 पिढ्यांपासून ही प्रथा चालू आहे, असे सांगण्यात येते. भिगारच्या पलंगावर देवीची पाच दिवस निद्रा असते. सार्वत्रिक सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानी निद्रेत असते. त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा होते.
आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दाने मातृत्वभावनेने दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहल्याबाई होळकरांची पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या रावबहादूर संस्थानचे कार्य कोल्हापूरच्या राजे छत्रपतीचे देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी अशी अनेक नावे आहेत. आता शहरात नवीन विकास योजनेचे पर्व पुढे येऊ घातले आहे.
तीनशे 15 कोटी रुपयांचा दमदार आराखडा मंजूर केला आहे. आता ही विकासाची कामे कोणत्या प्रकारे गतीने होतात, त्याकडे लक्ष लागले आहे. आराखड्यापूर्वी सरकारने प्राधिकरण केले असून, त्यासाठी सध्या सरकारी पातळीवर नियोजन चालू आहे. राज्यात तुळजाभवानी माता हे पहिले पूर्णपीठ आहे. याशिवाय माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ आहे. देवी ही सौदर्यवाहिनी आहे. भाळी गंध त्यावर सुवर्णअलंकाराने घातलेला चोप, गळ्यात वेगवेगळे दागदागिने यामुळे तुळजाभवानीचे रूप भाविकांना मोहून टाकते.